प्रशासन जनतेच्या दारी – आ. डॉ. संजय कुटे यांची उपस्थिती; विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध
श्री सुमेध दामधर प्रतिनिधी
संग्रामपूर (15 मार्च 2026) : राज्य शासनाच्या “महाराजस्व समाधान शिबिर” उपक्रमांतर्गत संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे समाधान शिबिर उत्साहात पार पडले. दिनांक १४ मार्च २०२६ रोज शनिवारला सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिरात विविध विभागांनी नागरिकांना अनेक सेवा जागेवरच उपलब्ध करून दिल्या. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळाला. सोनाळा येथील श्री सोनाजी महाराज मंगल कार्यालयात आयोजित या शिबिरात महसूल, पंचायत समिती, कृषी, समाजकल्याण, पुरवठा, आरोग्य आदी विभागांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले होते. नागरिकांना उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, सातबारा उतारे, शिधापत्रिका दुरुस्ती, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच अर्ज स्वीकृती अशा अनेक सेवा तत्काळ देण्यात आल्या.
यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून प्रशासन यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिबिरादरम्यान विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकृत करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना तत्काळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे वितरित करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांबाबत अधिकाऱ्यांनी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद खोद्रे , ग्रामपंचायत प्रशासक हर्षल खंडेलवाल, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माधव पायघन, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, मंडळ अधिकारी चामलाटे, पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, तलाठी कोतवाल तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून आले.
