शहाद्यामध्ये ग्रामीण उत्पादने आणि संस्कृतीचा जागर!
शहादा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिलांमध्ये नेतृत्व गुण आहेत. विक्री कौशल्य ही आहे. महिला स्वयं सहायता समूहाना भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मुख्यबाजार पेठ मिळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य केले तर त्यांना अधिक चालना मिळण्यास मदत होईल व ते अधिक प्रबळ होतील असे सांगत शहादा शहर वासियांनी तीन दिवसीय सरस महोत्सवाला भेट देऊन खरेदी करण्याचे आवाहन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.
येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या जवळील पंचायत समितीचा पटांगणात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,नंदुरबार तर्फे आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन 'उमेद' अभियानाच्या वतीने आयोजित ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे 'जिल्हास्तरीय सरस व विक्री प्रदर्शन - महोत्सवाचे उद्घाटन श्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार, शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार, सहायक गट विकास अधिकारी विकास राठोड, इंजिनीयर हरिश्चंद भोई , जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत चावरे उपस्थित होते.
सरस प्रदर्शनात शहादा तालुक्यातील एकूण १३ प्रभागातील व अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार व नवापुर तालुक्यातील उमेदचे ६० पेक्षा अधिक महिला स्वयं सहायता समूहाचे स्टॉल सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ग्रामीण भागातील उपस्थित महिला स्वयं सहायता समूहातील महिलांना संबोधित करताना उमेद अभियानाचा माध्यमातून सुरु असलेली महिला स्वयंसहायता गटाची चळवळ अधिक व्यापक झाली असून महिला बचत गटाचा माध्यमातून स्वावलंबी बनत असून, लखपती दीदी देखील होत आहे. तसेच बँक कर्ज, समुदाय गुंतवणूक निधी या माध्यमातून देखील कर्ज घेऊन विविध व्यवसाय करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी गटातील महिला प्रेरिका कविता अशोक भामरे, गणोर यांनी देखील अभियानाच्या माध्यमातून महिलांचे व कुटुंबाचे जीवनमान कसे उंचावत आहे. या बाबत प्रातीनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक राजेश देवकर यांनी तर आभार तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
