Breaking Ticker

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात (अॅकॅडमिक ऑडिटात) - 'अ' दर्जाचे मानांकन प्राप्त, सलग सहाव्यांदा मान, महाविद्यालयाची उल्लेखनीय झेप...



शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मागील वर्षांचे (अॅकॅडमिक ऑडिट) शैक्षणिक अंकेक्षण झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास या जाहीर केलेल्या महाविद्यालयांच्या मानांकनामध्ये 'अ' दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे शैक्षणिक अंकेक्षणात महाविद्यालयास सलग सहाव्यांदा 'अ' दर्जा प्राप्त झाला आहे. विद्यापीठातर्फे मिळणाऱ्या या मानांकनाकरिता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये अध्यापनाची गुणवत्ता, संशोधन उपक्रम, विद्यार्थी विकास कार्यक्रम तसेच संस्थेची एकूण शैक्षणिक प्रगती यांचे सर्वंकष मूल्यमापन करून हे मानांकन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांमधून सक्षम नागरिक घडविण्याचे उपक्रम, विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या, विविध परीक्षांचे निकाल, महाविद्यालय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, राबवित असलेल्या विद्यार्थी हिताच्या योजना, महाविद्यालयात उपलब्ध सोयी -  सुविधा, महाविद्यालयातील संशोधन उपक्रम, प्राध्यापकांनी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात नोंदविलेला सहभाग व सादर केलेले शोधनिबंध, अद्ययावत ग्रंथालय सुविधा, सामाजिक उपक्रम, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्र बिंदू ठेवून त्यात शैक्षणिक सोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, युवारंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान, विविध प्लेसमेंट मुलाखती द्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी माहिती मागविण्यात आली होती. कुलगुरूंनी गठित केलेल्या समितीने विद्यापीठाला प्राप्त झालेले अर्ज व त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची खातरजमा करून महाविद्यालयास 'अ' दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयाला वर्ष २०२२ मध्ये नॅककडून "अ" दर्जा प्राप्त झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील औषधनिर्माणशास्त्र शाखेतून नॅकला सामोरे जात "अ" दर्जा प्राप्त करणारे हे महाविद्यालय कबचौ उमवि कार्यक्षेत्रातील ३.१५ सीजीपीए प्राप्त करणारे एकमेव महाविद्यालय असून विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अॅकॅडमिक ऑडिटच्या या उत्तुंग यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, मंडळाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन व समाधान व्यक्त केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा राखून महाविद्यालयास सन्मानजनक ग्रेड मिळविण्यासाठी सहभाग दिल्याबद्दल प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी सर्वांचे अभिनंदन करीत आभार मानले आहे.


मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्‍या "थांबला तो संपला" हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या विविध ज्ञानशाखांची वाटचाल सुरू आहे. विद्यापीठातर्फे शैक्षणिक अंकेक्षणात पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला 'अ' दर्जा प्राप्त होणे ही अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आलेख उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळाव्यात,  महाविद्यालयाची गुणात्मक कामगिरी उत्तम रहावी यासाठी संस्थेची भूमिका नेहमीच आग्रही असते. याचा परिणाम निश्चितपणे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीवर होत असतो.

 बापूसाहेब दीपकभाई पाटील (अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा) 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक अंकेक्षणातून महाविद्यालयाला सलग सहाव्यांदा 'अ' दर्जा मिळवून महाविद्यालयाने गुणवत्ता टिकविण्यात सातत्य राखले आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या सामूहिक व प्रामाणिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे नेहमीच गुणात्मक विकासासाठी प्रोत्साहन मिळत असते. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण घोडदौड सुरू असून विद्यार्थी हितास प्राधान्य देत सर्वच विद्याशाखांचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी यापुढेही सांघिक प्रयत्न सुरूच राहतील. भविष्यातही गुणवत्ता वृद्धीसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल.



 ● प्रा. मकरंदभाई पाटील (समन्वयक - शैक्षणिक व सामान्य प्रशासन, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा ●

महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा जोपासण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाकडून मिळणारे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची समाधानकारक कामगिरी, महाविद्यालयात विविध उपक्रम राबविताना असणारी सांघिक भावना यामुळे महाविद्यालयास 'अ' दर्जा प्राप्त झाला आहे. यापुढेही महाविद्यालयाचे नावलौकिक करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाल्यामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक प्रतिमा अधिक बळकट झाली असून, भविष्यातील शैक्षणिक, संशोधन, कला, क्रीडा, सांस्कृतिक,  उपक्रमांना यामुळे नवे बळ मिळणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.