पत्रकार -मिलिंद खरात. 22 एप्रिल 2026. वाडा
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ च्या ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेतर्फे आज ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना BLO म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसरची कामे देण्यात येऊ नयेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
संघटनेचे विद्यमान सल्लागार व माजी अध्यक्ष प्रा. चितळे सर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रा. सतीश प्रधान, प्रा. कांतीलाल चव्हाण, प्रा. किसन धादवड व प्रा. ब्रिजेश विश्वकर्मा उपस्थित होते.
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, शिक्षकांवर आधीच शैक्षणिक, प्रशासकीय व मूल्यमापनाची मोठी जबाबदारी आहे. त्यात BLO ची अतिरिक्त कामे दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. निवडणूक प्रक्रियेसाठी स्वतंत्र यंत्रणा असताना शिक्षकांना वेठीस धरणे योग्य नाही.
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. "शिक्षकांचा प्रश्न योग्य आहे. मी संबंधित विभागांना याबाबत तातडीने सूचना देईन," असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या तत्पर प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले असून, शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
