Breaking Ticker

शहादा शहरात डास निर्मूलनासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कौस्तुभ मोरे आणि सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश


शहादा (प्रतिनिधी):

शहादा शहरातील वाढत्या डास प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. या संदर्भात कौस्तुभ मोरे, प्रकाश चित्ते, स्वप्निल पाटील आणि खुशाल शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. साजीद पिंजारी यांनी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या व भविष्यात नियोजित असलेल्या कामांची लेखी माहिती प्रसिद्ध केली आहे.

नगर परिषदेने दिलेल्या उत्तरातील महत्त्वाचे मुद्दे:

१. खाजगी प्लॉट धारकांना सूचना: शहरातील रिकाम्या खाजगी प्लॉटमध्ये कचरा आणि सांडपाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. अशा प्लॉट धारकांना सात दिवसांच्या आत साफसफाई करण्याबाबत नोटीस देण्यात आली असून, आदेश न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

२. सांडपाणी व गटार व्यवस्था: शहरातील पाटचारी सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, उपद्रव थांबवण्यासाठी जंतुनाशक फवारणी व डस्टिंग पावडरचा वापर केला जात आहे. तसेच शहरासाठी दीर्घकालीन 'भुयारी गटार योजना' राबवण्यात येणार आहे.

३. कचरा व्यवस्थापन: घंटागाडी चालकांकडे नोंदवही देऊन प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या सह्या घेतल्या जाणार आहेत, जेणेकरून कचरा संकलनाचे नियमित संनियंत्रण होईल.

४. डास उत्पत्ती रोखणे (Source Reduction): साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही सुरू असून, शौचालयांच्या गॅस पाईपवर मच्छर प्रतिबंधक नेटलॉन जाळी बसवण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांची जनजागृती मोहीम:

प्रशासकीय निवेदनासोबतच कौस्तुभ मोरे आणि प्रकाश चित्ते यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शहरात जनजागृती केली. प्रशासनाचे उत्तर केवळ कागदावर मर्यादित राहू नये, यासाठी त्यांनी लोकांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचवले आणि 'स्वच्छ शहादा, सुंदर शहादा' मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवला.

या संदर्भात नगर परिषदेने 'पुण्य नगरी' आणि 'लोकमत' सारख्या स्थानिक वर्तमानपत्रांतून जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष कामाचे पुरावे म्हणून प्रशासनाने सुरू असलेल्या फवारणीचे आणि स्वच्छता मोहिमेचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत.

कार्यकर्त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे शहादा शहरात आरोग्यविषयक कामांना गती मिळाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.