Breaking Ticker

बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाचा 'मिशन सुरक्षितता' उपक्रम; तांत्रिक प्रगती आणि जनजागृतीवर भर.



आंबेगाव (पुणे)( प्रतिनिधी :- तुषार असवले) :- 

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव च्या नजीक असलेल्या कोटमदरा या गावामध्ये  गेल्या काही दिवसांपासून परिसरातील शेतशिवारात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, बिबट्या आणि मानवातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाच्या वतीने गावात विशेष 'जनजागृती' उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये वन विभाग जुन्नर यांच्यामार्फत बिबट आणि मानव संरक्षण याबाबतीत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या पथकाने कोटमदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यावेळी बिबट्यापासून स्वतःचे आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सायंकाळच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर खेळू देऊ नका. घराचे दरवाजे बंद ठेवावेत.जनावरांचे गोठे चारी बाजूंनी बंदिस्त असावेत, जेणेकरून बिबट्याला आत शिरता येणार नाही.शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पिकाला पाणी भरण्यासाठी शेतात जाणे टाळावे. अपरिहार्य असल्यास सोबत किमान ३-४ व्यक्ती, टॉर्च आणि काठी ठेवावी.शेताच्या कडेने चालताना मोठ्या आवाजात बोलणे किंवा गाणी लावणे फायदेशीर ठरते. अश्या प्रकारच्या उपाययोजना वन विभागामार्फत करण्यात आल्या.


"बिबट्या हा आपला शत्रू नाही, तर तो निसर्गसाखळीचा भाग आहे. केवळ आपण सावधगिरी बाळगली तर संभाव्य हल्ले टाळता येतात. अफवांवर विश्वास न ठेवता काहीही संशयास्पद आढळल्यास वनविभागाला कळवावे." असा संदेश देण्यात आला.— वनपरिक्षेत्र अधिकारी (जुन्नर विभाग)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.