पिंगळीप्रतिनिधी
पिंगळी गावात भक्तिमय वातावरणात ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ३ व ४ मे २०२६ रोजी पार पडणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उन्मेषाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वेदघोष, पूजन, कीर्तन, भजन आणि प्रवचनांचा आध्यात्मिक संगम अनुभवायला मिळणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या या मंगल कार्यासाठी परिसरातील तसेच दूरवरच्या गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्रोच्चार, ध्वजारोहण, कलश पूजन, देवतांची स्थापना व पूजन अशा विविध विधी पार पडणार असून, सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभमुहूर्तावर मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
या धार्मिक विधीसाठी वेदमूर्ती श्री. वैजनाथ महाराज कांबळे व गुरुजन वर्ग तामसा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विविध संत-महंत व कीर्तनकारांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण अधिकच रंगणार आहे.
या सोहळ्यात आमदार श्री बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन होणार असून, ह.भ.प. श्री भिमराव महाराज खुर्पेकर यांचे काल्याचे कीर्तन हा विशेष आकर्षण ठरणार आहे. याशिवाय नामांकित भजनी मंडळेही आपल्या सादरीकरणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत.
गुरुवर्य शोभामाई यांच्या प्रेरणेतून आणि समस्त गावकरी मंडळी पिंगळी यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
