जिंतूर | प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ, जिंतूर यांच्या वतीने ना. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धांना खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिंतूरच्या क्रीडांगणावर रंगलेल्या या स्पर्धेत दमदार खेळ, टाळ्यांचा कडकडाट आणि स्पर्धात्मक उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.या अटीतटीच्या सामन्यांमध्ये सुलेमान सिद्दिकी मित्र मंडळ, जिंतूर यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. तर शहेजान सिद्दीकी संघ यांनी द्वितीय स्थान मिळवले. तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे मौलाना आझाद संघ व हिंगोली संघ यांनी पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकळे व नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शनिवार रोजी स्पर्धेचा थरारपूर्ण शेवट झाला असून, विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.या स्पर्धेमुळे जिंतूरमध्ये क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले
