Breaking Ticker

अखेर धापडपाडा बेलाचामाळकरांच्या संघर्षाला यश; वस्तीवर उजेडाचे स्वप्न साकार..



(प्रतिनिधी - तुषार असवले) पुणे (आंबेगाव) २२ एप्रिल २०२६ : 

तालुक्यातील आहुपे परिसरातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापडपाडा बेलाचा माळ येथील ग्रामस्थांचा दीर्घकालीन संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. अनेक वर्षे अंधारात जीवन कंठणाऱ्या या छोट्याशा वस्तीवर अखेर वीज पोहोचली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे २५ ते ३० लोकसंख्या असलेल्या या वस्तीमध्ये पूर्वीपासून वीजपुरवठा नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी कंदील आणि दिव्यांच्या प्रकाशावरच अवलंबून राहावे लागत होते. मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होत होता, तर दैनंदिन जीवनातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

ग्रामस्थांनी वेळोवेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कडे सिंगल फेज वीज जोडणीसाठी अर्ज केले. मात्र विविध कारणांमुळे हे अर्ज वारंवार नाकारले जात होते. तरीही ग्रामस्थांनी हार न मानता सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

अखेर त्यांच्या या चिकाटीला यश मिळाले असून संबंधित विभागाने वस्तीपर्यंत वीजपुरवठा सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून अंधारात राहणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्यात आता उजेडाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकमेकांना साखर वाटून आनंद व्यक्त केला. “आज आमच्या वस्तीवर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या यशामागे ग्रामस्थांची एकजूट, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा ठरला. आदिवासी भागातील अशा वस्तींसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.