प्रतिनिधी धनंजय माळेकर
रिसोड तालुक्यातील मंगलवाडी येथे वादळी पावसाचा तडाखा; अनेक घरांचे नुकसान रिसोड तालुक्यातील मंगलवाडी येथे काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसासह वादळी वाऱ्यामुळे गावात मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळामुळे अनेक घरांच्या पत्र्या उडाल्या असून काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक कुटुंबांचे घरातील साहित्य पावसामुळे भिजले असून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांनाही फटका बसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गावातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
