मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी 3/5/26
खुलताबाद, दि. 1 मे त्याला हक्क मिळावा हेच माझे काम आहे हा संदेश देत सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र वाघ यांनी कामगार दिनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. खुलताबाद येथील अपॉस्टोलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हायस्कुलमध्ये शुक्रवारी (ता. १) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात वाघ यांनी स्वतः ध्वजारोहण न करता हमाल कामगार महमूद शहा यांचा मुलगा हमाल कामगार इमरान मेहमुद शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करून घेतले.
उत्साहात कार्यक्रमाची सुरुवात
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस न्यूजचे पत्रकार राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.
वाघ यांचा प्रेरणादायी निर्णय
ध्वजारोहणासाठी विशेष अतिथी म्हणून विरेंद्र वाघ यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, व्यासपीठावर येताच वाघ यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. "आज कामगार दिन आहे. हा दिवस कष्टकरी, श्रमिकांचा आहे. त्यामुळे आजचा मान माझा नसुन या राबणाऱ्या कामगार बांधवाचा आहे," असे सांगत त्यांनी हमाल कामगार इमरान मेहमूद शाह यांना पुढे बोलावले व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. वाघ यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
हा मान मी प्रथमतःच सोडला" - विरेंद्र वाघ
यावेळी बोलताना विरेंद्र वाघ म्हणाले, "बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की कुठल्यातरी कार्यालयामध्ये कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे. परंतु सगळेच राजकीय नेते किंवा अधिकारी तो मान सोडत नाहीत. मी कुठलाही लोकप्रतिनिधी नसल्याने मला ते शक्य होत नव्हते. आज एएफकेजी शाळेतर्फे माझ्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठेवला आहे, असे निमंत्रण आले. मी शाळा व्यवस्थापकांना विनंती केली की आज कामगार दिन असल्याने कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण करूया. शाळा व्यवस्थापकांनीही यावर संमती दिली. मला प्रथमच मिळालेली संधी मी सोडून हमाल कामगार इमरान शाह यांना ती दिली. आजपर्यंत मी प्रत्येकाला त्यांच्या हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचे काम केले आहे. आज ज्याचा दिवस आहे, ज्याचा हक्क आहे, त्यांना ती संधी उपलब्ध करून दिली. यापुढे लोकप्रतिनिधींनी सुद्धा 1मे रोजी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण केले पाहिजे."
*विद्यार्थ्यांचे सादरीकरण, शाळेचे आवाहन:*
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. शाळा प्रशासनानेही कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजात श्रमिकांचा सन्मान कायम ठेवण्याचे आवाहन केले.
