Breaking Ticker

रिसोड शहरामध्ये अतिक्रमण विरोधात नागरिक आक्रमक



 प्रतिनिधी दिनांक 26/5/2026

  रिसोड मध्ये अतिक्रमणाविरोधात नागरिक आक्रमक ; शाळेकडे जाणारा मार्ग मोकळा करण्याची मागणी

रिसोड : शहरातील लोणी फाटा परिसरात भारत माध्यमिक शाळेकडे जाणाऱ्या दुर्गम मार्गावर झालेल्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, लोणी फाटा परिसरातील काही दुकानदारांनी सरकारी रस्ता व नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरच मुलीची छेडछाड होत असल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनेक वेळा तोंडी विनंती करूनही संबंधित दुकानदारांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे व बेकायदेशीर बांधकामांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.