Breaking Ticker

शासनाच्या धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जोरदार निर्देशने-तहसीलदारांना दिले निवेदन



मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी

राज्य शासनाच्या आरक्षणविषयक धोरणांविरोधात, वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या मुद्यांवर (दिनांक १८मे सोमवार रोजी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खुलताबाद तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष गुट्टे यांना सादर करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

एससी, एसटी, ओबीसी व इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका ही जनविरोधी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. शासन उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण व्यवस्थेला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा निषेध व्यक्त करत, सामाजिक न्यायाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून महागाईने कुटुंबांचे बजेट विस्कळीत झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदार संतोष गुट्टे यांना निवेदन देत विविध जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष गणेश तांदळे, जिल्हा सचिव सय्यद मुक्तार, जिल्हा संघटक बाबा पटेल, तालुका उपाध्यक्ष राजरत्न बोर्डे, राज बनकर, महासचिव राजाराम घुसळे, तालुका उपाध्यक्ष आरुण गायकवाड, कलीम पठाण, सुरेश गवळी, रवि जाधव, कैलास गिरी, नईम भाई चाऊस, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.