Breaking Ticker

दौंड तालुक्यातील वरवंड मध्ये रात्रीच्या अंधारात वैद्यमाती उत्खनन महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह



वरवंडमध्ये रात्रीच्या अंधारात अवैध माती उत्खनन  महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दैनिक समीकरण दौंड प्रतिनिधी : गणेश दिवेकर

दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे हे उत्खनन रात्री उशिरा सुरू असून, या प्रकाराकडे महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी जेसीबी व इतर अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन केले जात असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डंपर व इतर अवजड वाहनांद्वारे मातीची वाहतूक केली जात आहे. या वाहनांची सततची ये-जा सुरू असल्याने परिसरातील रस्त्यांची अवस्था खराब होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागांचे लक्ष या प्रकाराकडे वेधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या प्रकारा मुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचीही चर्चा आहे.

महसूल विभागाच्या परवानगीशिवाय अथवा निर्धारित अटींचे उल्लंघन करून मातीचे उत्खनन होत असल्यास त्याची तात्काळ चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पंचनामा करून उत्खननाची व्याप्ती, वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने आणि संबंधित परवानग्यांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दुसरीकडे, रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. वाहतुकीचे नियम, वाहनांची कागदपत्रे, वजनमर्यादा आणि वाहतुकीची वेळ याबाबत तपासणी केली जात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महसूल, पोलीस आणि खनिकर्म विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे रात्रीच्या वेळी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

दरम्यान, वरवंड परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या या अवैध माती उत्खनन प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.