वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन, पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी
सुमेध भाऊ दामधर संग्रामपूर प्रतिनिधी:
संग्रामपूर तालुक्यात १ जून २०२६ रोजी आलेल्या भीषण वादळ, अवकाळी पाऊस आणि ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, संग्रामपूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक गावांमध्ये केळी, कापूस, भाजीपाला तसेच इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच घरांची छप्परे उडून गेली असून दुकाने व व्यावसायिक आस्थापनांनाही फटका बसला आहे. विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पांतील सोलर पॅनेल वादळामुळे उखडून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण तालुक्यात विशेष सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र मूल्यमापन करून योग्य नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोर भिडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा छाया ताई बोदळे, उपाध्यक्ष राहुल मिलगे, सचिव यशवंत वानखेडे,जेष्ठ नेते वसुलकर काका, मिलिंद वानखडे, निलेश लहासे, सचिन शेगोकार, विक्रांत सपकाळ, जितेंद्र सुभेदार, प्रकाश सपकाळ, पंजाब इंगळे, राजेश तेलगोटे, आनंद बोदळे, अमोल सुलताने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. "नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना तात्काळ न्याय आणि नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला दिला आहे.
