मुनीर अब्बास शाह.छ.संभाजीनगर प्रतीनीधी.
महिलेचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा नेले हिसकावून
खुलताबाद तालुक्यातील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिकुंडीगाव येथील रहिवासी पूजा गंगाधर सोनद या सकाळी श्री घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी वेरूळ येथे आल्या होत्या. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्या मंदिर परिसरातील धर्मशाळा टी पॉइंटजवळ उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.
क्षणाचाही विलंब न लावता दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र जोराने हिसकावून घेतले. हा प्रकार इतक्या वेगाने घडला की महिला भाविकांना काही समजण्याच्या आतच चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार व सहायक फौजदार मनोहर पुंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
दरम्यान, मंदिर परिसर आणि मुख्य मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक घृष्णेश्वर दर्शनासाठी येत असताना अशा घटना घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिसांनी भाविकांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे तसेच मौल्यवान दागिने व वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
