जिल्हा प्रतिनिधी - संतोष भालेराव
4 जून 2026 वाशिम : जिल्ह्यातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक करून चोरीस गेलेला तब्बल ४ लाख ५४ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगरुळपीर पोलीस ठाणे हद्दीतील येडशी येथे ११ मे २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी संदीप चंदू वानखडे (रा. येडशी, ता. मंगरुळपीर) याच्यावर संशय निर्माण झाला.
पुणे येथे लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीने चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने विविध सोनारांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापे टाकून ५२ ग्रॅम सोने व ४२ ग्रॅम चांदी असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे गुन्ह्यातील चोरी गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला पुढील कारवाईसाठी मंगरुळपीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपीने यापूर्वी आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निकेश खटमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल क्षिसारगार, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक किशोर शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.
वाशिम पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
