जत /सांगली प्रतिनिधी अरुण कोळी
जत शहर नळपाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या विविध प्रभागातील रस्त्यांची कामे संबंधित ठेकेदाराने सुरू केली असलीतरी ही सर्व कामे ही अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन अशी होत असल्याने पावसाळ्यात या केलेल्या कामाचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहाणार नाही.
जत शहरातील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आ. श्री. गोपीचंद पडळकर यांनी ७६ कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना मंजूर केली.या नळपाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने पाईप लाईन टाकताना अक्षरशः रस्त्यांची चाळन केली आहे.
नुकतेच वर्षभरात केलेले शहरातील सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्ते या पाणीपुरवठा कामामुळे पूर्णतः उखाडलेले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस खड्डे पाडले आहेत.सध्या हे खड्डे बुजविण्याचे व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम संबंधित कामाचे ठेकेदार यांच्याकडून सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन असे होत आहे.या कामामध्ये कमी प्रमाणात खडी व डांबराचा वापर होत असल्याने पावसाळ्यातच या कामाची पोल खुलणार आहे.
जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी व उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी व सर्वच नगरसेवक यांनी या प्रकरणी वयक्तिक लक्ष घालून ही सुरू असलेली रस्त्यांची दुरुस्तीची कामे दर्जेदार होण्यासाठी आक्रमकपणा दाखवावा अशी अपेक्षा जतकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
