Breaking Ticker

हक्काच्या घरांसाठी पारधी समाजाची प्रतीक्षा; जतमधील घरकुल योजना अर्धवट अवस्थेत



  सांगली प्रतिनिधी : अरुण कोळी

जत-अचकनहळ्ळी रस्त्यावरील शासकीय धान्य गोदामाशेजारी आदिवासी पारधी समाजासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात येत असलेली घरकुल योजना अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून, या समाजाला त्यांच्या हक्काची घरे नेमकी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जत-मंगळवेढा रोडवरील छत्रपती शाहू नगर येथे आदिवासी पारधी समाजासाठी ५० हून अधिक घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत काही घरांचे विटांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून रस्त्यालगतच्या काही घरांना लोखंडी दरवाजे व खिडक्याही बसविण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरचे काम पूर्णपणे थांबले आहे.

आतील बाजूस असलेल्या अनेक घरकुलांचे बांधकाम केवळ चौकटीपर्यंतच झाले असून छप्पर, प्लास्टर, वीज, पाणी यांसारखी मूलभूत कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहे.

देखभालीअभावी या घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे व झुडपे उगवली आहेत. काही ठिकाणी बांधकामाची पडझड सुरू झाल्याचेही दिसून येत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली ही घरे वापराअभावी खराब होत चालल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रानावनात फिरून कष्टाने उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी पारधी समाजासाठी ही योजना आशेचा किरण ठरणार होती. मात्र शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या समाजाचे हक्काच्या घराचे स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले आहे.

पारधी समाजातील नागरिकांनी केंद्र व राज्य शासनासह एकात्मिक आदिवासी विकास विभागाने तातडीने लक्ष घालून अर्धवट घरकुलांचे काम पूर्ण करावे व लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.