प्रतिनिधी :राहुल दिवेकर
वरवंड दि.10 जून :-राज्यातील शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा भासत असल्या कारणाने एकीकडे मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या काही वर्षांपासून कुसुम सोलार योजना ,मागेल त्याला सोलरसारखे पर्याय (विहिर,बोरवेल) यासारख्या जलस्त्रोतांसाठी उपलब्ध करून शेतकरी वर्गास अवलंबण्यास सांगत आहेत,तर दुसरीकडे त्या प्रकल्पास बळकटी देण्यासाठी मात्र सक्षम पर्याय किंबहुना त्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत.
जसे की सोलर बसविण्यासाठी शेतकऱ्याला सर्व्हिस ही तितकीच महत्त्वाची आहे ,परंतु शेतकरी अद्यापही या सेवेपासून वंचित आहेत. जे शेतकरी या सर्व्हिसचा अगोदरपासून अनुभव घेत आहेत त्यांच्या या कटू अनुभवावरून इतर शेतकरी या सोलर सिस्टिमचा भाग होण्यास इच्छुक नाहीत असे दिसून येत आहे.सद्यस्थितीला सर्व्हिस हा पर्याय अगदीच चर्चेचा विषय ठरलेला आहे.
मार्केटमध्ये असलेल्या सोलर सिस्टम इन्स्टॉलेशन करणाऱ्या कंपन्या या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करताना दिसत नाहीत.सोलार कंपन्याचं हे चित्र जर असचं चालू राहिले तर शेतकरीवर्गाला पर्यायी व्यवस्था म्हणून कोणाकडे पहावे लागेल ? हा प्रश्न तर अनुत्तरीतच राहील !
अवकाळी पाऊस किंवा पाऊसाच्या वेळी येणाऱ्या सुसाट्याच्या वाऱ्यात यामध्ये तर चक्क सोलार पॅनल अगदी जमीनोदस्त झालेले पहावयास मिळत आहेत. असे लावलीजाव केलेली कामे सरकारी अधिकारी यांच्या लक्षात येऊनही या सिस्टिमचा भाग असणाऱ्या कंपन्या यांना कुठलेही भय राहिले नाही. म्हणजे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
तसेच कंपन्यांना कार्यालयामार्फत जे काही इन्स्टॉलेशनचे काम दिले जाते,त्याकामाचे आदेश (work order) या परिपत्रकातच केलेला असताना सोलार कंपन्या किंवा त्यांच्या यंत्रणा शेतकऱ्यांनाच वेठीस धरतात जसे की खड्डा खणणे मटेरियल शिफ्टिंग करणे , सिमेंट ,वाळू खडी आदी गोष्टींचे त्यांच्या इस्टीमेटमध्येच उल्लेख असतानाही याचा त्रास शेतकऱ्यांनाच दिला जात असल्याने शेतकरी वर्गातून यासाठी स्पष्ट विरोध केला जात आहे.एवढेच नव्हे तर वर्क ऑर्डर निघाल्यापासून सोलर सिस्टमचे ठराविक दिवसांतच इंस्टॉलेशन करण्यात यावे असाही त्यात उल्लेख त्यामध्ये असतो असा कोणताच नियम यांच्याकडून पाळला जात नसल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे .
या सोलार सिस्टिमचा भाग होणे फायदा की तोटा हा संभ्रम निर्माण झाला असून यामध्ये टोल फ्री नंबरवर संपर्क साधला असता काहीच प्रतिसाद दिला जात नाही. शेतकरी शेती पिकवण्यासाठी खूप कासावीस झालेला आपण पाहत आहोत.शेतकऱ्याला शेतीत पिकांना पाणी देण्यासाठी ना वीज व्यवस्थित मिळते,ना पर्यायी व्यवस्था सुरळीत चालतात.रात्रंदिवस पळूनही त्याच्या पदरी निराशाच पडत आहे.परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आपण अनुभवत आहोतच.एकूणच शाळेतील निबंध *"विज्ञान शाप की वरदान"* याची प्रचिती प्रत्यक्षात व्हायला नको, हा संदेश शेतकरी वर्ग देत आहे.
