Breaking Ticker

पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार बैठक संपन्न



 पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांचा पत्रकारांशी मनमोकळा संवाद

प्रतिनिधी - संतोष भालेराव

9 जून वाशिम : वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे यांची पत्रकारांसोबत बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, अवैध व्यवसायांवरील कारवाई तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून गुन्हे शाखेची विशेष पथके संपूर्ण जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांवर सातत्याने धडक कारवाई सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

नागरिकांनी आपल्या परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी अथवा संशयास्पद घटनांची माहिती तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यास देऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीदरम्यान उपस्थित पत्रकारांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पत्रकारांना कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी, धमक्या अथवा अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन कटिबद्ध असून कोणतीही अडचण उद्भवल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.

बैठकीस द युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा दैनिक समिकरणचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भालेराव, महाराष्ट्र सुपरफास्ट मराठी न्यूजचे प्रतिनिधी किशन काळे, के. एस. न्यूजच्या मोहोड मॅडम, प्रतिनिधी इरफान भाई शेख तसेच जिल्ह्यातील विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

पोलीस प्रशासन व प्रसारमाध्यमांमधील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही बैठक उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.