Breaking Ticker

७० हजारांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड मनपाचा बीट निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात


​पुणे जिल्हा प्रतिनिधी(अनिल कांबळे)पिंपरी  दि. १२ जून:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 'ड' क्षेत्रीय कार्यालयातील एक मोठा लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. पिंपळे गुरव परिसरातील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तब्बल ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीट निरीक्षक उमेश लोंढे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महानगरपालिका वर्तुळात आणि अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. 

​मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव भागात एका अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई प्रस्तावित होती. ही कारवाई रोखण्यासाठी आणि बांधकाम पाडण्यापासून वाचवण्यासाठी 'ड' क्षेत्रीय कार्यालयाचा बीट निरीक्षक उमेश लोंढे याने तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली.

​तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पिंपरी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची रोकड स्वीकारत असतानाच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उमेश लोंढे याला रंगेहात पकडले आणि ताब्यात घेतले.

​पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागातील भ्रष्टाचाराचा हा प्रकार चव्हाट्यावर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपी उमेश लोंढे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात महापालिकेतील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही शोध आता एसीबीचे पथक घेत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.