अपघात होण्यची.शक्यता
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव ते तिसगाव यामहत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत.
या रस्त्यावर दररोज शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, सकाळच्या वेळी दूध संकलन केंद्रावर दूध घेऊन जाणारे शेतकरी, तसेच विविध कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रत्येक प्रवास हा कसरतीचा ठरत असून, दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वेळावाहनचालकांचा तोल जाऊन किरकोळ अपघातही घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या रस्त्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
