सांगली प्रतिनिधी: -अरुण कोळी
जत तालुक्यातील आवंढी या गावाचा 'डोंगरी भाग' म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी आवंढी व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी याकामी पुढाकार घेऊन गावाचा कायापालट करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
गलाई व्यवसायिकांचे गाव उपेक्षितच!
आवंढी हे गाव सोन्या-चांदीचे आणि गलाई व्यवसायिकांचे गाव म्हणून जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र, आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या नावलौकिक असूनही, या गावाच्या पायाभूत विकासाकडे अद्यापपर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून म्हणावे तसे लक्ष दिले गेलेले नाही, अशी खंत ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
निसर्गरम्य डोंगररांगा आणि वनविभागाची जमीन
सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या सभोवताली नैसर्गिक सौंदर्याने नटलेले मोठमोठे डोंगर आहेत. या डोंगरांवर ५ ते १० टन वजनाचे अवाढव्य नैसर्गिक खडक पर्यटकांचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. यातील बहुतांश डोंगराळ भाग हा वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या भागाला निसर्गाचे वरदान लाभले असले, तरी विकासाच्या सोयी-सुविधांअभावी हा परिसर मागे पडला आहे.
शिराळा पॅटर्नच्या धर्तीवर विकासाची अपेक्षा
"माजी मंत्री ना. श्री. शिवाजीराव नाईक यांनी शिराळा तालुक्यातील बहुतांश गावांचा 'डोंगरी भागात' समावेश करून घेतला होता. त्यानंतर शासनाकडून विशेष निधी आणून त्यांनी त्या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला. त्याच धर्तीवर आता जतचे भाजप आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनीही विशेष प्रयत्न करावेत. आवंढी गावाला डोंगरी भागाचा दर्जा मिळवून देऊन महायुती सरकारकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणावा आणि या भागाचा कायापालट करावा," अशी जाहीर मागणी आवंढी व परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
आता या मागणीवर आमदार गोपीचंद पडळकर काय पावले उचलतात आणि महायुती सरकारकडून आवंढीच्या विकासासाठी किती निधी मिळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
