मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधी..
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव शिवारातील वंजार मळा, बुखार वस्ती परिसरातील गट नंबर ५५४ येथील शेतात काम करत असताना विद्युत शॉक लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (दि. ९) रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे देभेगाव व गल्लेबोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव विकास जगन्नाथ लग्गड (वय ३० रा. देभेगाव, ता. कन्नड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास लग्गड हे गल्लेबोरगाव येथील वंजार मळा, बुखार वस्ती परिसरातील शेतात शेतीची कामे करत असताना त्यांचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आला. त्यावेळी त्यांच्या जवळपास कोणीही नसल्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वेरूळ येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार आनंद अडसूळ करीत आहेत.
