जत | सांगली प्रतिनिधी : अरुण कोळी
जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडली. अक्काताई उमाजी गळवे (वय ६५) यांचे सर्पदंशामुळे निधन झाले. या घटनेमुळे गोंधळेवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्काताई गळवे यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
अक्काताई गळवे या गावातील प्रेमळ व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाळ्यात शेतात किंवा झुडपांमध्ये काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
