Breaking Ticker

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न सुरक्षा सायरन वाजल्याने ‘माही ज्वेलर्स’मधील मोठी चोरी टळली



जत सांगली प्रतिनिधी अरुण कोळी

जत शहरासह संपूर्ण तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रविवारी मध्यरात्री जत शहरातील मध्यवर्ती हनुमान मंदिरासमोरील ‘माही ज्वेलर्स’ हे सराफा दुकान फोडण्याचा धाडसी प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी लोखंडी रॉडने दुकानाचे शटर उचकटले, मात्र दुकानात बसवलेला आधुनिक सुरक्षा सायरन अचानक वाजल्याने चोरट्यांनी तिथून पळ काढला. सायरनमुळे लाखो रुपयांचा ऐवज वाचला असला, तरी एकाच रात्री जत आणि मुचंडी गावात झालेल्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोखंडी रॉडने उचकटले शटर

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आधी माही ज्वेलर्सची रेकी केली. त्यानंतर शटर लोखंडी रॉडच्या सहाय्याने सुमारे वीतभर वर उचलले. मात्र, शटर उचकडताच दुकानाची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होऊन सायरनचा मोठा आवाज झाला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी तात्काळ पोबारा केला. पहाटे ५ वाजता दुकानदाराला शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

मुचंडी गावातही चोरट्यांचा डल्ला

जत शहरातील घटना ताजी असतानाच, याच रात्री मुचंडी गावातही अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केली. तालुक्यात एकाच रात्री लागोपाठ तीन ठिकाणी चोऱ्यांचे सत्र घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे खुले आव्हानच दिले आहे.

चौकातील कॅमेरे बंद; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

घटनेनंतर संतप्त व्यापाऱ्यांनी स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मारुती चौकात नगरपरिषदेने आणि लोकप्रतिनिधींच्या निधीतून बसवलेले तीनही सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे फक्त नावालाच लावले आहेत का, असा संतप्त सवाल माही ज्वेलर्सचे मालक मुसाजी याद शेख यांनी केला आहे. हे कॅमेरे सुरू असते तर चोरट्यांचा माग काढणे सोपे झाले असते, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

जत शहर व ग्रामीण भागातील पोलिसांची रात्रीची गस्त पूर्णपणे थंडावली असल्याचे चित्र आहे. बाजारपेठ, सराफा गल्ली आणि मुख्य चौकांमध्ये नियमित पोलीस गस्त असावी, तसेच प्रमुख चौकात रात्रीच्या वेळी पोलिसांचे वाहन तैनात ठेवण्यात यावे, जेणेकरून गुन्हेगारांवर वचक बसेल. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी जत येथील व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.