Breaking Ticker

महानंदच्या कोळसा प्रकल्पाला NGTचा झटका



ESP यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत प्रकल्प बंद; 15 जुलैपासून आदेश लागू

प्रतिनिधी | राहुल दिवेकर

दौंड तालुक्यातील वरवंड येथील महानंद डेअरीच्या 10 TPH क्षमतेच्या कोळसा आधारित प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) पश्चिम विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आवश्यक असलेली इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर (ESP) प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आल्याने 15 जुलै 2026 पासून प्रकल्प बंद ठेवण्याचे निर्देश लवादाने दिले आहेत. ESP प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

संग्राम सुभाष दिवेकर, केशव भगत, विजय दिवेकर व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना लवादाने हा आदेश दिला. याचिकाकर्त्यांनी प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, उपलब्ध नोंदींचा विचार करून लवादाने 15 जुलैपासून प्रकल्प बंद ठेवण्याचे आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरच सुरू करण्याचे निर्देश दिले.

यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) प्रकल्प प्रत्यक्षात बंद असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे तसेच पर्यावरणीय नुकसानभरपाई (EDC) निश्चित करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास ₹5 लाखांची बँक हमी जप्त करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जुलै 2026 रोजी होणार आहे.


*याचिकाकर्ते संग्राम दिवेकर म्हणाले* :

"राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, लोकवस्तीमध्ये 10 TPH कोळसा आधारित प्रकल्पाला परवानगी कोणत्या कायदेशीर व तांत्रिक निकषांवर देण्यात आली, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी."


*ठळक बाबी*

*15 जुलैपासून प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश.

*ESP यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरच प्रकल्प सुरू करण्यास परवानगी.

*आदेशाचे उल्लंघन झाल्यास ₹5 लाखांची बँक हमी जप्त.

*MPCB ला प्रतिज्ञापत्र व EDC अहवाल सादर करण्याचे निर्देश.

*पुढील सुनावणी 21 जुलै 2026 रोजी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.