अन्यथा १६ जुलैला 'रस्ता रोको' आंदोलन – शिवसेनेचा NHAI ला इशारा
सांगली प्रतिनिधी:- अरुण कोळी
मौजे शेगाव (ता. जत) येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-965G वरील अपघातप्रवण परिस्थितीबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने न केल्यास १६ जुलै २०२६ रोजी तीव्र 'रस्ता रोको' आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना जत तालुका प्रमुख तथा शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे पदाधिकारी श्री. दिपक तुकाराम बुरुटे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) प्रकल्प संचालक, पंढरपूर यांना याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, 'ओम साई प्रतिष्ठान, शेगाव' या सामाजिक संस्थेने १ जानेवारी २०२६ रोजी ई-मेलद्वारे महामार्गावरील अपूर्ण कामे, चुकीची रचना आणि वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत तक्रार केली होती. मात्र, तब्बल सहा महिने उलटूनही NHAI प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शेगाव परिसरातील महामार्गावर जीवघेणे गतिरोधक, दिशादर्शक फलक, स्पीड लिमिटचे फलक आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
श्री. दिपक बुरुटे यांनी प्रशासनाला १५ जुलै २०२६ पर्यंत महामार्गावरील आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत काम सुरू न झाल्यास १६ जुलै २०२६ रोजी शेगाव येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात येईल. प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी NHAI प्रशासन व संबंधित कंत्राटदाराची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी, जत, पोलीस निरीक्षक, जत पोलीस ठाणे तसेच National Highway PWD, जत यांनाही पाठविण्यात आल्या असून, आवश्यक पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
शेगाव परिसरातील नागरिकांनी महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
