हक्क न मिळाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : मनोहर भाऊ यरपुरवाड
दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जांब बु, ता. मुखेड येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंपतरावजी डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जांब बु येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीमध्ये गावातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चंपतरावजी डाकोरे पाटील यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5 टक्के निधी वेळेवर मिळत आहे की नाही, दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे की नाही, तसेच गावातील किती दिव्यांग बांधवांना घरकुल मंजूर झाले आहे, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या सुविधा व योजना मिळत नसतील तर त्यामागील कारणांची माहिती संबंधित प्रशासनाने पंधरा दिवसांच्या आत लेखी स्वरूपात द्यावी, असे निवेदनही देण्यात आले. अन्यथा दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या सुविधा व न्याय मिळत नसतील तर आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा आशयाचे घोषवाक्यही यावेळी करण्यात आले.
या बैठकीस गावातील गणपत गोंड, बाबासाहेब सोनकांबळे, मोहन थोटे, शादुल कासार, जमील शेख, दत्ता आंदे, जळबा गायकवाड, राजू श्रीखंडे, बबन पुंडे, उमाकांत जामकर, माधव गोंड, आकाश गोंड, तेजेराव शिकारे, सोमनाथ साताळे, लक्ष्मण लांडगे, मनोहर यरपुरवाड यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.

