Breaking Ticker

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समता सैनिक दलाचा पाठिंबा...

 



सम्यक रविंद्र घुले 

प्रतिनिधी,यवतमाळ


यवतमाळ येथील जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या बेमुदत आंदोलनाला सोमवार दिनांक(7 सप्टेंबर 2026) रोजी समता सैनिक दल, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. हा लढा केवळ विशिष्ट समाजाचा नसून सुशिक्षित तरुणांच्या हक्कांचा आहे. जात, धर्म किंवा सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी समता सैनिक दल नेहमी खंबीरपणे उभे राहील,अशी ठाम भूमिका याप्रसंगी दलाचे महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल विजय वासनिक यांनी स्पष्ट केली.महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल विजय वासनिक यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी समता सैनिक दलाचे मार्शल प्रा. अनिकेत उबाळे (मुंबई विभाग), मार्शल प्रा. प्रकाश दातार (राज्य कार्यकारिणी सदस्य), मार्शल हेमंत गायकवाड (जिल्हा संघटक, यवतमाळ) आणि मार्शल सम्यक घुले (अकोला बाजार,यवतमाळ) यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. सूरज मेश्राम आणि विद्यार्थी प्रतिनिधींशी प्रदीर्घ संवाद साधला. "तरुणांच्या या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता संवैधानिक न्याय, समता आणि मूलभूत अधिकारांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन मार्शल प्रा. अनिकेत उबाळे यांनी केले.समता सैनिक दलाच्या या भेटीनंतर आणि त्यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यानंतर, या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि आमदार राजू तोडसाम यांनी आंदोलन स्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. मंत्री महोदय आणि आमदारांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली.या प्रसंगी मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या तात्काळ मान्य केल्या असून उर्वरित तांत्रिक अडचणींवर सविस्तर तोडगा काढण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या (Chief Secretary) उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके व मा.आमदार राजू तोडसाम यांनी दिलेल्या या लेखी आश्वासनानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय प्रक्रियेवर विश्वास ठेवत आपले बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. समता सैनिक दलाने दाखवलेली एकजूट आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.