दैनिक समीकरण / अमोल शिंगाडे
शेळगाव (ता. इंदापूर), दि. ९ : शेळगाव येथील शिंगाडे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर बालगोपाळांच्या उत्साहात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
बुधवार, दि. ९ रोजी शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी कृष्ण-राधेच्या गवळणींच्या सुमधुर गजराने परिसर भक्तिमय झाला होता. कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सजलेली मुले-मुली, भगव्या झेंडूच्या फुलांसह लालबुंद गुलाबांच्या आकर्षक फुलांनी सजविलेली तसेच उंचावर बांधलेली दहीहंडी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या मनमोहक वातावरणामुळे आबालवृद्ध मंत्रमुग्ध झाले होते.
तत्पूर्वी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भारत बरळ तसेच उपशिक्षिका श्रीमती. सुरेखा सोपान बनकर यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले.
यानंतर बालगोपाळांनी सुपरहिट गाण्यांच्या तालावर नाचत थर रचून उत्साहात दहीहंडी फोडली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पालक वर्षा गायकवाड, सीमा शिंगाडे, अंगणवाडी सेविका मोहिते मॅडम मदतनिस माने मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा ऐश्वर्या ननवरे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
