जिल्हा प्रतिनिधी. वैभव हराळे
माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; नांदणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण
नांदणी : शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे संकेत मिळत आहेत. माधुरी वनतारा येथून नांदणीच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून माधुरीच्या घरवापसीची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या नांदणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माधुरीच्या घरवापसीसाठी त्यांनी तब्बल ४५ किलोमीटरची पदयात्रा केली होती.
याशिवाय वनतारा संस्थेच्या सीईओंसोबत संवाद साधून माधुरीला नांदणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच न्यायालयीन लढाई आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी माधुरीच्या घरवापसीसाठी प्रयत्न सुरू ठेवले.
आता माधुरी वनतारा येथून नांदणीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आल्याने नांदणीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माधुरी पुन्हा आपल्या मठात परतणार असल्याने तिच्या स्वागतासाठी नांदणीकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, माधुरीच्या घरवापसीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
