Breaking Ticker

वीर वाजेकर महाविद्यालयाची मुंबई विद्यापीठात दुहेरी सुवर्ण कामगिरी


 




उरण : सुनिल ठाकूर 

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत क्ले मॉडेलिंग व पोस्टर मेकिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावत प्राणीशास्त्र विभागाच्या प्रथमेश सदानंद म्हात्रेची दुहेरी सुवर्ण कामगिरी!

 मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित 59 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला,   विज्ञान  व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे येथील विद्यार्थी प्रथमेश सदानंद म्हात्रे याने आपल्या कलागुणांची उल्लेखनीय छाप उमटवत क्ले मॉडेलिंग आणि पोस्टर मेकिंग या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाचा मान मिळविला. प्रथमेशने आपल्या सर्जनशीलतेचा, कलात्मक कल्पनाशक्तीचा आणि कौशल्याचा प्रभावी आविष्कार सादर करत दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक (प्रथम क्रमांक) प्राप्त केले. एकाच युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत दोन स्वतंत्र कला प्रकारांत सुवर्णपदक मिळविण्याची ही कामगिरी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रथमेश सदानंद म्हात्रे याचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल चे ज्येष्ठ सदस्य  श्री. रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष श्री. पी. जे. पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील, श्री. सुधीर घरत, सौ. भावना घाणेकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.  आमोद ठक्कर, उपप्राचार्य डॉ. संदीप घोडके तसेच सांस्कृतिक समितीच्या चेअरमन डॉ. सुजाता पाटील यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माजी विद्यार्थी ह्यांनी त्याच्या या यशाबद्दल कौतुक करून पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रथमेशच्या या दुहेरी सुवर्ण कामगिरीमुळे  महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या यशाने महाविद्यालयाच्या कलाक्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.