*मुखेड तालुक्यात पावसाची भीषण तूट; अंबुलगा, जाहूर व येवती महसूल मंडळातील शेतकरी संकटात ,तातडीने दुष्काळ जाहीर करा- मारोती पाटील वडजे उंद्रीकर*
नांदेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*
मुखेड : मुखेड तालुक्यातील अंबुलगा, जाहूर आणि येवती महसूल मंडळांत अतिशय भिषण परिस्थिती आहे , ऑगस्ट महिन्यात अपेक्षित सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. विशेषतः *सोयाबीन, तूर, कापूस* यांसारख्या पिकांना पावसाच्या *दीर्घ खंडाचा मोठा फटका* बसत असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
*ऑगस्ट महिन्यात या महसूल मंडळांसाठी सरासरी पर्जन्यमान २०५.२ मिमी अपेक्षित असताना अंबुलगा मंडळात केवळ ६०.४ मिमी (२९.४ टक्के), जाहूर मंडळात ५१.९ मिमी (२५.३ टक्के) तर येवती मंडळात ७९.९ मिमी (३८.९ टक्के) इतकाच पाऊस नोंदवला* गेला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच पावसाची *मोठी तूट* निर्माण झाली.
*सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात परिस्थिती अधिक गंभीर*
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १५४.७ मिमी सरासरी पर्जन्यमान अपेक्षित असताना आजपर्यंत अंबुलगा येथे केवळ ७.३ मिमी (४.७ टक्के), जाहूर येथे ४.१ मिमी (२.७ टक्के) आणि येवती येथे अवघा २.१ मिमी (१.७ टक्के) पाऊस झाला आहे.
*पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता*
खरीप हंगामातील पिकांच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सोयाबीन व तूर पिकांच्या वाढीवर तसेच फुलोरा, शेंगा भरणे आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेषतः ऑगस्टमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत २५ ते ३९ टक्क्यांच्या आसपासच पाऊस आणि त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २ टक्क्यांपासून ५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झाल्याने ही परिस्थिती केवळ पावसाची कमतरता नसून खरीप पिकांसाठी गंभीर संकट बनली आहे.
*शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी*
या विदारक परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने NDRF मधून हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करून पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशीही मागणी आहे.
*पीकविमा योजनेचा तातडीने लाभ द्यावा*
पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पीकविमा योजनेतील ट्रिगर पूर्ववत करून शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा. ट्रिगर लागू करण्याबाबत अडचणी असल्यास पीक कापणी प्रयोग तातडीने घेऊन प्रत्यक्ष उत्पादनातील घट निश्चित करावी आणि त्याआधारे पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पावसाच्या कमालीच्या तुटीमुळे अंबुलगा, जाहूर आणि येवती महसूल मंडळातील शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे शासनाने कागदी प्रक्रिया आणि विलंब न करता तातडीने मदत, नुकसानभरपाई आणि पीकविम्याचा लाभ देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
