Breaking Ticker

अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.



नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाच्या धडक कारवाईत वडाळा रोड भारतनगर येथील मे. अजमेरी बेकरीवर धडक कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक परवाना नसल्याचे आणि उत्पादन आणि साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने १५१ किलो केक आणि कपकेक जप्त करण्यात आले. संबंधित बेकरीला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली. ‘फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६’ या विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली. सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त अन्न व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि संकेत येलमामे यांच्या पथकाने तपासणी करत कारवाई केली. तपासणीमध्ये अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे तसेच उत्पादन आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीच्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थिती असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा असुरक्षित असण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने कारवाई केली. कारवाईदरम्यान ३५ हजार ७५० रुपयांचे १४३ किलो केक, तसेच १२ हजार २४० रुपयांचे आठ किलो कपकेक, असा सुमारे ४७ हजार ९९० रुपयांचा १५१ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा नष्ट करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.