Breaking Ticker

पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना उरण पोलीसांनी 24 तासात केली अटक



उरण : सुनिल ठाकूर 

उरण दि २५ जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उरणमध्ये गुरुवारी ( दि २२)घडली. या प्रकरणी उरण पोलिसांनी अवघ्या २४  तासात अष्टांग पाटील आणि ऋतिक पांडुरंग चाळके या दोन आरोपींना अटक केली आहे.त्याच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(२), १२६(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी दिली आहे.

   उरण, चिरनेर परिसरात जुन्या वादातून हा गंभीर प्रकार घडला. फिर्यादी नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर रस्त्यात अडवून, हातातील कोयत्यासारख्या लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यावर पाच ते सात वार करून त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतून त्याला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवीमुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांना आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

    नवीमुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त दीपक साकोरे, अपर आयुक्त प्रमोद शेवाळे, उप आयुक्त अमित काळे यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक राहुल काटवानी यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे नवी मुंबई परिसरातून दोन्ही आरोपींना २४ तासाच्या आत ताब्यात घेतले असून त्यांना दि.२७/१०/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून विनापुराव्याच्या अशा ५ मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदर कामगिरीत पोउपनि गोविंद केंद्रे, सपोनि भरत पाटील, सपोनि वैभव रोंगे, पोउपनि रोशन काथारा, पोहवा जयंत घरत, शशिकांत घरत, किशोर फंड, पोना अनिल मानकर, गंगाराम कचरे, पोशि रियाज शेख, बसवराज सकपाळ यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.