महामानवांना अभिवादन; गावातून भव्य धम्म रॅलीने दिला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश!
सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर ( शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र धम्मग्रंथाचा प्रवरणा दिन गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पिप्री (अडगाव) येथे मोठ्या उत्साहात, मंगलमय वातावरणात आणि धम्ममय जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून संपूर्ण गावातून भव्य धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीत गावातील धम्म उपासक व उपासिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बुद्धांच्या शांती, करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या विचारांचा जयघोष करीत संपूर्ण गावात धम्ममय वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला पूज्य भंते स्वरानंदजी आणि पूज्य भंते महानामजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा उत्तरचे जिल्हा संस्कार सचिव मिलिंद वानखडे, जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भाऊराव गव्हांदे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दीपकभाऊ पहुरकर, माजी कोषाध्यक्ष संग्रामपूर तालुका भारतीय बौध्द महासभा निलेश लाहासे, तथागत अंभोरे, जितेंद्र सुभेदार आणि पोलीस पाटील कमलाकर गायगोळ यांच्यासह गावातील मान्यवर, धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तथागत गौतम बुद्धांच्या धम्मविचारांचे महत्त्व विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्मक्रांतीच्या संदेशाचा जागर केला. समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवता ही मूल्ये रुजविण्यासाठी बुद्धांचा धम्म आचरणात आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समता पंच मंडळ व सुजाता महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे प्रवरणा दिनाचा सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
