वर्षावासानिमित्त २६ ऑक्टोबरला उरुवेला बुद्ध विहारात कार्यक्रम; धम्म उपासक-उपासिकांसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर (शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६) : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाच्या ग्रंथ प्रवरना समारोहाचे आयोजन सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता उरुवेला बुद्ध विहार, सोनाजी नगर, सोनाळा येथे करण्यात आले आहे. वर्षावासाचे औचित्य साधून उरुवेला बुद्ध विहार समिती महिला मंडळ, समता नवयुवक मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा, शाखा संग्रामपूर यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आषाढी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या पवित्र ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या वाचन, पठण व मननाची परंपरा अश्विनी पौर्णिमेपर्यंत सुरू असून, या धार्मिक व धम्मप्रबोधनात्मक उपक्रमाची सांगता ग्रंथ प्रवरना समारोहाने होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचे विचार, धम्माचे तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनवादी वैचारिक वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ बौद्ध तत्त्वज्ञान, मानवतावाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या वाचनातून समाजात वैचारिक जागृती निर्माण व्हावी, धम्मविचारांची रुजवण व्हावी आणि नव्या पिढीला महामानवांच्या विचारांची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या समारोहासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, सक्रिय सभासद, समता सैनिक दलाचे सैनिक, भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व धम्म उपासक आणि उपासिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मंगलमय समारोहाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन उरुवेला बुद्ध विहार समिती महिला मंडळ, समता नवयुवक मंडळ, सोनाजी नगर, सोनाळा आणि भारतीय बौद्ध महासभा, शाखा संग्रामपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
