Breaking Ticker

राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरची दुचाकीला धडक; महिला वकिलाचा अपघाती मृत्यू.



नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.

कामासाठी घराबाहेर पडलेल्या महिला वकिलाच्या आयुष्याचा प्रवास राणेनगर उड्डाणपुलावर अचानक थांबला. मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि. २३) सकाळी कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शीतल दीपक नरवले (३०,रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शीतल नरवले या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने (एम एच १५ एफएल ९५९०) कामावर जात होत्या. हॉटेल स्नेहींतसमोरील उड्डाणपुलावरून त्या मार्गक्रमण करीत असताना मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसून त्या रस्त्यावर कोसळल्या. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालकाला द्वारका परिसरात पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.