नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संदीप फाउंडेशन येथील ओक्रा कॅन्टीनविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. कॅन्टीनमधील अन्नपदार्थांत झुरळे आणि इतर कीटक आढळून आल्याच्या तसेच अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तपासणी करून संबंधित कॅन्टीनचा परवाना निलंबित केला.
या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या पावलांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधून दररोज खाद्यपदार्थ घ्यावे लागतात. अशा वेळी अन्नपदार्थांची स्वच्छता आणि गुणवत्ता राखणे ही कॅन्टीन चालकांची जबाबदारी आहे. मात्र, अन्नपदार्थांमध्ये झुरळे व अन्य कीटक आढळल्याच्या तक्रारींमुळे या जबाबदारीच्या पालनाबाबत प्रश्न निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यांची दखल घेऊन तपासणी आणि परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने अन्न व औषध प्रशासनाची (FDA) कार्यतत्परता समोर आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने ,सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक भड व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अन्न व्यवसाय चालकांनी आस्थापनांमध्ये स्वच्छता राखणे, अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक व योग्य हाताळणी करणे बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
