Breaking Ticker

जायकवाडीतून रब्बी ज्वारी व चारा पिकांसाठी तीन आवर्तने सोडा!



आ. राजेश विटेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

तानाजी चंदे तालुका प्रतिनिधी -गंगाखेड परभणी, दि. २६  : परभणी जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करावे. तसेच आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आणखी दोन आवर्तनांचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी खरीप पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात चांगला पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या धरणात ७८ टक्के जिवंत पाणीसाठा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ, पाथरी आणि परभणी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे. याशिवाय या कालव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो, असे आमदार विटेकर यांनी म्हटले आहे.

ज्वारी उत्पादनासह चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत

रब्बी हंगामात ज्वारी आणि चारा पिकांसाठी तीन आवर्तने सोडल्यास शेतकऱ्यांना ज्वारीचे पीक घेणे शक्य होईल. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटू शकेल. ज्वारीसारख्या प्रमुख अन्नधान्य पिकाचे उत्पादन वाढण्यासोबतच शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होईल. तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईसाठी आतापासून नियोजन करा

एप्रिल आणि मे २०२७ या कालावधीत वाढणाऱ्या तापमानामुळे पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आणखी दोन आवर्तनांचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे आमदार विटेकर यांनी म्हटले आहे.

तसेच कालव्याची दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण केल्यास कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. त्यामुळे या कामांचे नियोजनही दुष्काळी मंत्रिगटाच्या बैठकीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांनाही चारा पुरविणे शक्य

जायकवाडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून परभणी जिल्ह्यात ज्वारी आणि चारा पिकांचे उत्पादन वाढविल्यास दुष्काळग्रस्त बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांनाही चारा पुरविणे शक्य होईल. जवळच्या जिल्ह्यांना चारा उपलब्ध झाल्यास वाहतूक खर्चातही बचत होऊ शकते. चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचा चारा राज्य सरकार हमीभावाने खरेदी करणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि अन्नधान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळ्यासाठी दोन आवर्तनांचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.