मा. विश्वस्त श्री मार्तंडा महाराष्ट्र नंदा प्रदीप राऊत यांची शासनाला कायदेशीर नोटीस.
उरण :सुनिल ठाकूर
या वर्षी गणेशोत्सवादरम्यान अत्यंत उंच मूर्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक दुर्दैवी अपघात झाले आहेत. दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथे 22 फुटी मूर्ती कोसळून 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर इतर भागांतही मूर्ती उलटण्याच्या गंभीर घटना घडल्या. या अपघातांसोबतच, विसर्जनादरम्यान आणि विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर व जलस्रोतांमध्ये महाकाय मूर्तीचे शीर धडावेगळे होणे, मूर्ती भग्न अवस्थेत कचऱ्यासारख्या पडून राहणे अशा प्रकारे दैवताची भीषण विटंबना झाल्याचे वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
या सर्व गंभीर प्रकारांची दखल घेत, पनवेलमधील जागरूक नागरिक आणि श्री मार्तंड देवसंस्थान (जेजुरी) च्या मा. विश्वस्त सौ. नंदा प्रदीप राऊत यांनी आपल्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग, नगरविकास विभाग आणि ऊर्जा विभागाला (महावितरण) स्पीड पोस्टाद्वारे कायदेशीर नोटीस (Representation) पाठवली आहे.
शासनाने पुढील 15 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासाठी मूर्तीच्या उंचीवर कमाल 10 ते 12 फुटांची कायदेशीर मर्यादा निश्चित करावी, सर्व सार्वजनिक मंडळांना मूर्तीचे 'स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र' बंधनकारक करावे आणि विसर्जित मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी 'सन्मानपूर्वक विसर्जन व पुनर्संचयन नियमावली' लागू करावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
प्रशासनाने यावर तातडीने ठोस धोरण किंवा नियमावली जाहीर न केल्यास, सार्वजनिक हितासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि देवतेची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका (PIL) दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा सौ. नंदा प्रदीपं राऊत (मा. विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी पुणे) यांनी दिला आहे.
