उरण :सुनिल ठाकूर
जगद्गुरू श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी’ साई देवस्थान, साईनगर, वहाळ, पनवेल (रायगड) येथे पोचल्या वर साई देवस्थान तर्फे संस्थापक अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील यांनी उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्या सौ. पार्वती ताई पाटील. जगन शेठ पाटील. अनंत पाटील. मो. का. मढवी. शिरीष ठाकूर. विश्वास पाटील. ह. भ. प. रामकृष्ण महाराज, श्रीकांत मुंबई कर आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा आणि वसुंधरेचे रक्षण करा’ हा संदेश घेऊन हजारो अनुयायी या दिंडीच्या माध्यमातून नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. जगद्गुरूंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमात अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात येत असून, गावागावांत स्वच्छता, वृक्षारोपण, निसर्गसंवर्धन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती केली जात आहे.
मुंबई पीठाच्या वतीने वसई तालुक्यातील शिरसाड येथून या दिंडीचा उत्साहात शुभारंभ झाला. वसई ते नाणीजधाम असा सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास दिंडीकडून करण्यात येत असून, सुमारे १६ दिवसांच्या या प्रवासात दररोज २० ते २५ किलोमीटरचे अंतर पार केले जात आहे.
साईनगर येथे दिंडीचे आगमन होताच भाविक व सेवेकऱ्यांनी फुलांची उधळण, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, सेवेकरी आणि अनुयायी उपस्थित होते.
२१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे आयोजित वारी उत्सवात या दिंडीचे आगमन होणार आहे. नागपूर (विदर्भ पीठ), तेलंगणा, मराठवाडा, मुंबई, नाशिक, पुणे आणि गोवा आदी विविध भागांतूनही ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.
अध्यात्माची जोड पर्यावरण संवर्धनाला देत ‘वसुंधरा पायी दिंडी’च्या माध्यमातून निसर्गरक्षणाचा संदेश जनमानसात रुजविण्याचा हा अभिनव उपक्रम ठरत आहे.
