कोरपना प्रतिनिधी : जगन्नाथ पिदुरकर
कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी (खुर्द), येथे राज्य कर निरीक्षक संतोष निरंजने यांनी विद्यार्थ्यांशी करिअर मार्गदर्शनपर संवाद साधला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत राज्य कर निरीक्षक पदापर्यंत मजल मारलेल्या संतोष निरंजने यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.
संतोष निरंजने हे स्वतः जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. विविध परीक्षांमध्ये यश मिळवत नुकतीच राज्य कर निरीक्षक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीतील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी प्रामाणिक प्रयत्न, योग्य नियोजन आणि ध्येयाप्रती समर्पण यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
यावेळी बोलताना त्यांनी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांपेक्षा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याची आणि यश संपादन करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न समजता मोठी स्वप्ने पाहावीत, उपलब्ध शैक्षणिक संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनात निर्माण झालेले विविध प्रश्न संतोष निरंजने यांना विचारले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत स्पर्धा परीक्षा, करिअरच्या विविध संधी, अभ्यासाचे नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी सविस्तर संवाद साधला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांनी विचारलेले प्रश्न पाहून समाधान व्यक्त करताना, अशा प्रकारचा करिअर संवाद आपण पहिल्यांदाच साधत असल्याचे संतोष निरंजने यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक कैलास मस्के यांनी विविध करिअरच्या संधी, त्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि स्वतःच्या आवडीनिवडी व क्षमतेनुसार योग्य क्षेत्राची निवड कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसमोर यशस्वी जीवनाचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून संतोष निरंजने यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अर्चना वडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका कु. पुष्पा सोयाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक अशोक राठोड यांनी केले.
