सुमेध दामधर (तालुका प्रतिनिधी)
संग्रामपूर ( शुक्रवार, दि. ०९ ऑक्टोबर २०२६) : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल भागातील महाराष्ट्र मंधील नावलोकिक संतभूमी सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराजांचा यात्रा महोत्सव दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे रथोत्सव. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रात्रीपासून रथाची गावातून प्रदक्षिणा काढली जाते. या रथोत्सवासाठी महाराष्ट्रासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून तसेच मध्यप्रदेश तसेच सातपुड्याच्या आदिवासी बहुल भागातून मोठ्या संख्येने भाविक व भक्त गण सोनाळ्यात दाखल होतात. यात्रेदरम्यान व्यापारी वर्गाकडून विविध दुकाने थाटली जातात. तसेच पाळणे, अगाशी पाळणे, मौत का कुवा ,ब्रेक डान्स,पन्नालाल गाढव यांसह विविध मनोरंजनाची साधने आणि सांस्कृतिक कार्यक्रम व इतर साधने आयोजन केले जाते. रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने व्यापाऱ्यांना अधिक वेळ व्यवसाय करण्याची संधी मिळावी, तसेच भाविकांनाही यात्रेचा आनंद घेता यावा, यासाठी यात्रा महोत्सव हा चार दिवस रात्रभर सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश वानखडे, श्रीकांत झाल्टे, शाम बोरपी, राजु डांगे, गजानन पवार व सोनाळा येथील नागरिकांच्या वतीने दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. यात्रेचा कालावधी चार दिवसांचा असून या काळात रात्रीच्या वेळेतही भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करावे, तसेच अग्निशामक व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडून यात्रेच्या वेळेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, व्यापाऱ्यांचा विचार करून वेळेत वाढ करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले. सोनाळा ग्रामसभेतही यात्रेबाबत मोठ्या बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, यात्रा महोत्सव रात्रभर सुरू ठेवण्यास समस्त ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव अधिक नियोजनबद्ध पद्धतीने, भाविकांची सुरक्षितता आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा विचार करून रात्रभर सुरू राहण्याचे गावकरी व निवेदन कर्ताची मागणी आहे .
