भाजपा महिला मोर्चाचा सेवासंकल्प अभियानात उत्स्फूर्त सहभाग; मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी महिलांची प्रार्थना
सुमेध दामधर | तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर शुक्रवार, दि. ०९ ऑक्टोबर २०२६) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशा २५ वर्षांच्या सार्वजनिक कार्यप्रवासानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत सोनाळा येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘सेवा के रंग, राष्ट्र के संग’ या संकल्पनेतून आकर्षक रांगोळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल मंदिरासमोर साकारलेल्या सुंदर रांगोळीने परिसराचे लक्ष वेधून घेतले असून, या उपक्रमातून महिलांनी सेवाभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. या कार्यक्रमात गावातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्वातीताई लव्हाळे यांनी साकारलेल्या देखण्या रांगोळीने कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवली. यावेळी उपस्थित महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सेवाभाव, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक सहभाग या मूल्यांना अधोरेखित करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत केवळ रांगोळी उत्सवच नव्हे, तर समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यामध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’ आणि ‘आंगन का उत्सव’ या उपक्रमांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा सेविकांचा सत्कार करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. समाजाच्या तळागाळात कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणे, सेवाभावाची भावना अधिक दृढ करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, हा या अभियानाचा महत्त्वाचा संदेश आहे.
हा रांगोळी उत्सव यशस्वी करण्यासाठी वैशालीताई बोदडे, ज्योतीताई खोकले, ज्योतीताई लव्हाळे, सुलभाताई लव्हाळे, स्वातीताई लव्हाळे, सविताताई आतकड, अर्चनाताई देशमुख, पार्वतीताई घट्टे, वनमालाताई सुलताने, ज्योतीताई खान्देशे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महिला कार्यकर्त्यांच्या एकजुटीने आणि उत्स्फूर्त सहभागाने सोनाळ्यातील हा उपक्रम लक्षवेधी ठरला. रांगोळीच्या रंगांतून व्यक्त झालेला सेवाभाव आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश गावात चर्चेचा विषय ठरला असून, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
