Breaking Ticker

उकळी बु. येथे ‘रमाई’ एकपात्री प्रयोगाचे प्रभावी सादरीकरण!


कु. संबोधी रायपुरे हिने साकारली रमाईंची संघर्षगाथा; त्याग, समर्पण आणि स्वाभिमानाच्या अभिनयाने उपस्थितांचे डोळे पाणावले

सुमेध दामधर तालुका  प्रतिनिधी 

संग्रामपूर ( सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६) : तालुक्यातील उकळी बु. येथे टीम परिवर्तन, संग्रामपूर यांच्या वतीने ‘रमाई’ नाटिकेच्या एकपात्री प्रयोगाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. एड. प्रा. ए. एच. खंडेराव लिखित या नाटिकेत पातुर्डा येथील शालेय विद्यार्थिनी कु. संबोधी शैलेंद्र रायपुरे हिने रमाईंची भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली. तिच्या भावस्पर्शी अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली, तर रमाईंच्या संघर्षमय जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या प्रसंगांमुळे वातावरण भावनाप्रधान झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी टीम परिवर्तन, संग्रामपूर आणि सद्धम्म सहायता संघाचे सदस्य उपस्थित होते.

       कु. संबोधी रायपुरे हिने आपल्या अभिनयातून रमाईंच्या जीवनातील दुःख, कष्ट, त्याग, समर्पण आणि स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण केले. रमाईंच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी केलेला त्याग आपल्या अभिनयातून जिवंत करत तिने प्रेक्षकांना भावनिक साद घातली. तिच्या सशक्त अभिनयामुळे अनेक प्रेक्षक भावूक झाले आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एका शालेय विद्यार्थिनीने रमाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके प्रभावी सादरीकरण केल्याने तिच्या कलागुणांचे विशेष कौतुक करण्यात आले.

       यावेळी विशाल दामोदर आणि भीमराव परघरमोल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. रमाईंचा त्याग, त्यांची सहनशीलता, कुटुंबाप्रती असलेले समर्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान याविषयी विचार मांडण्यात आले. रमाईंचे जीवन हे त्याग, संघर्ष, निष्ठा आणि आत्मसन्मानाचे प्रेरणादायी प्रतीक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीष तायडे यांनी केले, तर कु. दिव्यानी तायडे हिने बहारदार सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला उकळी बु. तसेच पंचक्रोशीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमाईंच्या जीवनकार्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या एकपात्री प्रयोगामुळे सामाजिक प्रबोधनाला चालना मिळाली. कु. संबोधी रायपुरे हिच्या प्रभावी अभिनयातून रमाईंच्या त्यागाची आणि संघर्षाची गाथा नव्या पिढीसमोर साकार झाली. या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.