तीन किलोमीटरची धोकादायक प्रेतयात्रा; सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर!
गावित चंद्रकांत पालघर जिल्हा प्रतिनिधी
सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हुंड्याचीवाडी, बोरीचिवाडी आणि बोरशेती येथील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर; हुंड्याचीवाडीत अंत्यसंस्कारासाठी अवघी चार ते पाच फूट लांबीची जागा! पावसाळ्यात मृतदेह पुरात वाहून जाण्याची भीषण वेळ!
मोखाडा तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सायदे हुंड्याचीवाडी, सायदे बोरीचिवाडी आणि बोरशेती या वाड्यांमधील स्मशानभूमीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने विकासाच्या अनेक पायऱ्या पार केल्या, शासनाच्या विविध योजना गावागावांत पोहोचल्याचा दावा केला जात आहे; मात्र आदिम कातकरी समाजाला मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी हक्काची स्मशानभूमी मिळत नसेल, तर या विकासाचा नेमका लाभ कोणाला झाला, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. हुंड्याचीवाडी येथील ग्रामस्थांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तब्बल तीन किलोमीटर अंतरावरील डोंगरदरीतून, घनदाट जंगलातील अरुंद पायवाटेने खांद्यावर घेऊन जावा लागत आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध असलेल्या जागेची लांबी अवघी चार फूट असल्याचे ग्रामस्थ सांगतात. एवढ्याशा जागेत आदिम कातकरी समाजातील व्यक्तींचे दफनविधी आणि अग्निडागाचे अंत्यसंस्कार करावे लागतात. एका समाजाच्या मृत्यूनंतरच्या सन्मानासाठी चार फूट जागाही पुरेशी उपलब्ध नसावी, ही संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आणि मन हेलावून टाकणारी परिस्थिती आहे.
पावसाळ्यात तर या परिस्थितीचे भयावह रूप समोर येते. डोंगरदऱ्या, निसरडे कातळखडक, घनदाट जंगल आणि चिखलमय पायवाट अशा धोकादायक मार्गावरून खांदेकऱ्यांना मृतदेह घेऊन जावे लागते. एखाद्याचा पाय घसरला तर मृतदेहासह खांदेकऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मृतदेह दफन केल्यानंतर मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे तो वाहून जाण्याची वेळही काही प्रसंगी आल्याचे ग्रामस्थ सांगतात. पावसाळ्यात मृतदेहाला अग्नी देण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. चार फूट जागा, तीन किलोमीटरचा डोंगरदरीतील प्रवास आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधांचा अभाव; ही परिस्थिती पाहता आदिम कातकरी समाजाच्या वाट्याला मृत्यूनंतरही संघर्षच का, असा प्रश्न निर्माण होतो.
या प्रश्नावर नामदेव कडाळी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, हा संघर्ष त्यांच्या आजोबा पंजाबापासून सुरू आहे. अनेक वर्षे झाली, पिढ्या बदलल्या; मात्र स्मशानभूमीचा प्रश्न काही सुटलेला नाही. ग्रामसेवकांकडे वारंवार हा प्रश्न मांडूनही सकारात्मक निर्णय झालेला नसल्याची त्यांची तक्रार आहे. "आज माझे आजोबा गेले, उद्या आम्हालाही याच वाटेने जावे लागणार आहे. आमच्या मृत्यूनंतर तरी आम्हाला हक्काची स्मशानभूमी मिळणार आहे का?" असा हृदय हेलावून टाकणारा सवाल त्यांनी उपस्थित केला. जंगलातील पायवाटेने मृतदेह घेऊन जाताना आम्ही नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करायचा? हा प्रश्न विचारण्याची वेळ हुंड्याचीवाडीतील आदिम कातकरी समाजावर आली आहे. अशिक्षित असल्यामुळे आम्हाला अर्ज लिहिता येत नाही, आमचा प्रश्न कोणाच्या दरबारात मांडायचा, असा हतबल सवालही ग्रामस्थ करत आहेत.
केवळ हुंड्याचीवाडी नव्हे, तर सायदे बोरीचिवाडी आणि बोरशेती येथील स्मशानभूमीचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाकडून ग्रामीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असताना ग्रामपंचायतीला या वाड्यांसाठी हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून देता येत नाही का? सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे का, की आदिम कातकरी समाजाचा हा प्रश्न कायम दुर्लक्षितच राहणार आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान वाघ, हिरामण भोये आणि वाळू हिलिम उपस्थित होते. त्यांनीही तिन्ही वाड्यांना स्वतंत्र व पुरेशी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आता ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित शासन यंत्रणा या प्रश्नाची दखल कधी घेणार? मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार या समाजाला मिळणार की नाही? स्वातंत्र्यानंतरही जर आदिम कातकरी समाजाला स्मशानभूमीसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर 'ग्रामपंचायत नेमकी कोणाच्या विकासासाठी?' हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
जिवंतपणी हक्काच्या सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी अवघ्या चार ते पाच फूट जागेची मर्यादा! तीन किलोमीटरची डोंगरदरीतील प्रेतयात्रा आणि पिढ्यान्पिढ्यांची स्मशानभूमीची प्रतीक्षा संपणार तरी कधी? सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने आता तरी जागे होऊन आदिम कातकरी समाजाला न्याय द्यावा!असा प्रश्न आदिम कातकरी समाज करत आहे .
