विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल; उकळी बु. शाळेचा मान उंचावला
दैनिक समीकरण सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी
जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, उकळी बु. येथील उपक्रमशील शिक्षक भिमराव परघरमोल यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झाल्याबद्दल नवनियुक्त केंद्रप्रमुख कुलदीप बुंदे यांच्या हस्ते शाल (महावस्त्र) व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भिमराव परघरमोल सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य ते करतात. विशेष म्हणजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी वर्तमानपत्रांमध्ये लेखन करून आपली लेखनकला विकसित करीत आहेत. दर आठवड्याला आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शारीरिक कवायती, विविध खेळ आणि मनोरंजक कृतींचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होण्यास मदत होत आहे. केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, कला, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत SCERT, पुणे या राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थेने त्यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड केली. ही निवड त्यांच्या शैक्षणिक कार्याची पावती असून उकळी बु. शाळेसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. या सत्कारप्रसंगी मुख्याध्यापक के. एम. डाबेराव, शिक्षक शंकर बगाडे, कोकीळा बोपटे, गजेंद्र सुलतान, प्रवीणकुमार लिंगोट, हरीओम काकडे, दिव्यांनी तायडे (स्वयंसेवा शिक्षिका) आदी उपस्थित होते.
